top of page
Search

Valley of Flowers and Hemkund Trek: August 2021

व्हॅली ऑफ फ्लॉवर आणि हेमकुंड साहेब ट्रेक (७-१४ ऑगस्ट २०२१)


गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग करोनाच्या विळख्यात अडकलेले असताना हळूहळू चांगल्या दिवसांची चाहूल मिळायला लागली आणि मग आमच्या ग्रुप मधल्या सर्व जणांचं परत एकदा लॉंग ट्रिप्स चे प्लॅनिंग सुरू झालं. अशातच Prasanna Joshi आणि Add-venture India या संस्थेने अरेंज केलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स , हेमकुंड साहेब ,बद्रीनाथ आणि माना या ट्रेक ची माहिती Deven Purandare ला मिळाली.(बद्रिनाथ आणि माना village कोरोना मुळे कॅन्सल करावे लागले)


आमच्या लेह-लडाख या ग्रुप मध्ये त्यानेही ही माहिती लगेच फॉरवर्ड केली आणि मग सर्व मिळून 17 जण मुंबईहून या ट्रेकमध्ये जाण्यासाठी तयार झालो. हा तीन दिवसाचा प्रॉपर ट्रेक असल्यामुळे काही जणांच्या मनात थोडी धाकधूक होती. त्यातच करोनाची अनेक बंधने या ट्रेक मार्गात उभी होती पण त्या सर्वांवर मात करून शेवटी 7 ऑगस्टला आम्ही एकूण 39 जण डेहराडून एअरपोर्टवर उतरलो. डेहराडून वरून दोन बस च्या साह्याने आम्ही ऋषिकेशला पोहोचलो. एअरपोर्ट पासून चा ऋषिकेश पर्यंतचा रस्ता छान निसर्गरम्य होता,दोन्ही बाजूला झाडे आणि आजूबाजूला माकडेही भरपूर दिसत होती. साधारण पन्नास मिनिटांनी आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलो हॉटेलमध्ये बाल्कनीत उभे राहिल्यावर गंगेच्या पाण्याचा खळखळाटा चा मंद आवाज त्या शांत वातावरणात येत होता. सर्वजण फ्रेश झाल्यावर मग प्रसन्न जोशींनी म्हणजेच आमच्या ऑर्गनायझर यांनी एक मीटिंग तिथे घेऊन ट्रेक करताना काय काळजी घ्यावी लागेल याची माहिती दिली. मीटिंग संपल्यावर आम्ही आजूबाजूला फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडलो आणि तिथून जवळच असलेला प्रसिद्ध लक्ष्मण झूला बघण्यासाठी गेलो. रात्री लाइट्स मध्ये लक्ष्मण झुला खुप छान दिसत होता. तिथे आम्ही फोटो काढले व काहींनी जप माळ खरेदी केली.


दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर साडेसहा पावणेसातला आमचा पुढचा प्रवास सुरु झाला पण वाटेत दरड कोसळल्याने आमचा मूळ मार्ग बदलून जवळजवळ ऐंशी किलोमीटर फेरा घेऊन आम्हाला पुढे जायचे होते. साडे आठ पावणेनऊला मध्ये नाश्त्यासाठी एका हॉटेल मध्ये थांबलो तिथे गरम गरम पराठा ,छोले ,चहा, कॉफी असा नाश्ता सर्वांनी घेतला .त्या हॉटेलच्या पाठच्या बाजूला अलकनंदा नदीचा सुंदर प्रवाह खळखळत होता, खुप निसर्गरम्य जागा होती. पुढे निघालो तेव्हा वाटेमध्ये प्रसिद्ध तिहरी धरण बघायला मिळाले. पण पुढे अडचणींचा डोंगर उभा राहणार होता कारण आमच्या मोठ्या बसचा टायर पंचर झाला आणि जवळ जवळ दीड पावणेदोन तास मधल्या वाटेतच वाया गेला. हळूहळू करत चार वाजता आम्ही एका छोट्याशा हॉटेल जवळ थांबलो जिथे आम्ही मॅगी , कढी-भात, चहा असे खाऊन घेतले कारण दुसरी बस पुढे गेलेली होती आणि आमचे अजूनही जेवण झालेले न्हवते. शेवटी जवळजवळ संध्याकाळी साडेसहा वाजता आम्ही जिथे जेवणाची व्यवस्था केली होती त्या हॉटेल ला पोहोचलो आणि सकाळचे जेवण तिथे केले व पुढे निघालो. हळूहळू पावसालाही सुरुवात झाली होती आणि आम्हाला जिथे पोचायचे होते ती जागा अजून बरीच दूर होती दरम्यान आमचे पुढे गेलेली बस चिमोली गावाजवळ अडकली कारण पुढे दरड कोसळली होती . रात्रीचे जवळ जवळ दहा वाजायला आले होते .त्यामुळे मिळेल त्या हॉटेलमध्ये पटापट खोल्या बुक करून सर्वांनी त्या रात्री तिथेच राहायचे ठरवले. त्या रात्री डाळ भात, मॅगी असे खाऊन सर्व जण आपापल्या खोल्यांमध्ये झोपून गेले कारण प्रवासाने सर्व बरेच थकले होते.


तिसर्‍या दिवशी सकाळी साडेआठ वाजता सर्वजण तयार झाले त्याच हॉटेलमध्ये पराठा , चहा कॉफी नाश्ता म्हणून खाऊन, रस्ता मोकळा झाल्याची बातमी आल्यावर आमची बस पुढे जोशीमठ ला जाण्यासाठी निघाली. जोशीमठ वरून पुढे तसेच आम्ही गोविंद घाट पर्यंत दुपारी साडेबारा पर्यंत पोहचलो. प्रवासात झालेल्या अडचणींमुळे आम्ही वेळेच्या खूप पाठी होतो. जिथून ट्रेक सुरु करायचा होता त्या पुलना गावापर्यंत(४ किलो मीटर) आम्हाला ७-८ जणांच्या ग्रुपने जीपने नेण्यात आले. सर्व ग्रुप तिथे पोहोचेपर्यंत जवळजवळ पावणे दोन होऊन गेले आणि शेवटी दोन वाजता हळूहळू करत आमचा पुलना ते घांगरिया ट्रेक सुरू झाला. हा पूर्ण ट्रेक जवळजवळ नऊ किलोमीटरचा आहे. रस्ता बऱ्यापैकी चांगला पायऱ्यांचा बांधलेला असला तरी पूर्ण ट्रेक हा चढ्या स्वरूपाचा असल्यामुळे चढताना दम लागतो. पण चढता चढता आजूबाजूला जे काही निसर्गसौंदर्य दिसत होते ते पाहून मन तृप्त झाले, हिरवीगार झाडी मधून येणारे छोटे मोठे धबधबे ,वाटेत लागणारे छोटे पूल यामुळे या ट्रेकचा रस्ता अगदी निसर्गरम्य झाला आहे. मध्ये मध्ये फोटो काढत, गप्पा मारत सर्वजण आपापल्या वेगाने अंतर पार करत होते पण अपेक्षेपेक्षा अंतर खूपच जास्त आणि दमावणारे असल्याने हळूहळू काहीजणांना त्रास व्हायला लागला आणि चढणे कठीण व्हायला लागले.. त्यांचा वेगही खूपच मंदावला. वाटेत मॅगी ,चहा-कॉफी चे स्टॉल लागत होते तिथे थांबून काही जण आराम करत होते पण एकूणच झालेल्या उशिरा मुळे अंधार पडू लागला आणि अंतर अजूनच कठीण वाटायला लागले. मागे रेंगाळलेल्या ना एकत्रित रीत्या पुढे घेऊन टॉर्च, बॅटरी च्या साह्याने हळूहळू करत शेवटी सर्व जण रात्री घांगरिया गावात पोहोचले. शेवटची बॅच पोचायला जवळजवळ पावणे अकरा वाजले होते सर्व जण खूपच दमले होते. मग हॉटेल प्रिया जिथे आमची व्यवस्था केली होती तिथे पोळी, वरण भात ,बटाट्याची भाजी असे जेवण जेवून सर्वजण आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले.


10 ऑगस्ट: आज आमचा व्हॅली ऑफ फ्लावर चा ४ km अंतराचा चढ्या स्वरूपाचा ट्रेक होता. सकाळी सात वाजता पोहे, कॉर्न फ्लेक्स, ब्रेड, चहा ,कॉफी असा नाश्ता करून साधारण आठ वाजल्यापासून एक एक जण ट्रेकसाठी पुढे निघाले... व्हॅली ऑफ फ्लावरच्या एन्ट्री पोस्ट वर नावांची एन्ट्री करून मग पुढे निघालो... सुरूवातीपासूनच सुंदर सुंदर फुले दिसण्यास सुरुवात झाली होती .अतिशय सुंदर निसर्गरम्य रस्ता , आणि विविध रंगाची फुले मन प्रसन्न करत होती. रस्ता अतिशय चिंचोळा, चढ्या स्वरूपाचा असल्यामुळे बर्‍यापैकी दमछाक होत होती. हे उद्यान संरक्षित असल्यामुळे इथे एक तर पायी किंवा डोली,pittu ( माणसाच्या पाठीवर बास्केटमध्ये बसून)च्या सहाय्याने वर चढता येऊ शकते. मध्ये मध्ये पाणी पीत ,गोळ्या चघळत संथगतीने सर्वांची वाटचाल सुरू होती आजूबाजूचे निसर्गसौंदर्य तर इतके सुंदर होते की ते डोळ्यात कसे साठवायचे हे समजतच नव्हते. आम्ही गेलो त्या वेळेला जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोक त्या व्हॅली ऑफ फ्लावर मध्ये आलेले होते ,त्यामुळे रस्त्यात सोबत कोण ना कोणतरी भेटत होते एकटेपणा मुळीच जाणवत नव्हता. साधारणता साडेअकरा ते एक या वेळेमध्ये हळूहळू आमच्या ग्रुप मधले त्या फुलांच्या दरीमध्ये पोहोचले(साधारण चार ते पाच तास चढण्यासाठी वेळ लागत होता). विविध प्रकारचे अनेक प्रजातींची छान छान फुले दरी मध्ये पहावयास मिळाली. सर्वजण फोटो काढण्यात दंग झाले होते, दरी आठ किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे त्यामुळे ज्याला जितके आत जायचे होते तितके जाऊन ते दरी बघून येत होते. तिथे सर्वांनी आपापले पॅक लॉन्च खाऊन आधी सांगितल्यानुसार दीड पावणेदोन वाजता परत फिरण्यास सुरुवात केली...

येताना रस्ता उतरणीचा असल्यामुळे बऱ्यापैकी चांगल्या वेगामध्ये सर्वजण उतरून येत होते, फक्त उतरताना पायावर जोर पडत असल्यामुळे व काही ठिकाणी खूपच तीव्र उतार असल्यामुळे काळजी घेऊन उतरावे लागत होते.दुपारी चार पर्यंत सर्वजण हॉटेल मध्ये परत आले मग त्या हॉटेलच्या हॉलमध्ये बसून सर्वांनी थोडा वेळ गप्पा मारल्या चहा प्यायला आणि मग आराम करायला थोडा वेळ रूममध्ये गेले. पाच वाजता गरमागरम पकोडे ,चहा, कॉफी असा नाश्ता झाल्यावर रूम मध्ये कोणी गप्पा मारत , पत्ते खेळत बसले. रात्री नऊ वाजता रोटी भात, दाल ,मटर पनीर बेत होता त्यावर आडवा हात मारून सर्वजण लवकर झोपायला गेले कारण दुसर्‍या दिवशी हेमकुंड साहिब चा ट्रेक होता.


11 ऑगस्ट: हेमकुंड साहेब चे अंतर सहा किलोमीटर एवढे होते पण सहा किलो मीटर मध्ये पाच हजार फूट उंची गाठली जाणार होती त्यामुळे हा ट्रेक तसा कठीण होता. आमच्या ग्रुपमधील काही जणांनी चालत जायचे ठरवले तर काहींनी घोड्यावरुन, डोली मधून हा ट्रेक पूर्ण करायचा असे ठरवले. नेहमी सारखा सकाळी सात वाजता उपमा, ब्रेड, चहा ,कॉफी असा नाश्ता घेऊन सर्वजण ट्रेक साठी निघाले. जे चालत जाणार होते ते साडेसात आठ लाच पुढे निघाले आमच्यापैकी काही जणांना घोडे मिळायला वेळ लागल्यामुळे आम्ही साधारण साडे दहा अकरा वाजता घोड्यावरून ट्रेकसाठी निघालो पूर्ण चढ्या स्वरूपाचा हा ट्रेक अत्यंत निसर्गरम्य अशा रस्त्यावरून पूर्ण होतो. जसे आम्ही वर वर चढत होतो तसतसे धुक्याच्या चादरीत विरघळून जायला होत होते. वातावरणही छान थंडगार झालेले होते आणि आजूबाजूला अनेक प्रकारची सुंदर रंगांची फुलं रस्त्यामध्ये आम्हाला साथ देत होती, निसर्गाचे एवढे सुंदर रूप पाहून मला क्षणभर असेच वाटले की मी स्वर्गात घेऊन पोहोचले आहे. जसे आम्ही टोकाच्या जवळ जायला लागलो तस तसे आम्हाला उत्तराखंडचे राष्ट्रीय फूल असलेल्या ब्रह्मकमळाचे जागोजागी दर्शन व्हायला लागले पिवळसर रंगाचे असलेले हे सुंदर दैवी फुल बघून जीव अगदी शांत झाला. जागोजागी ब्रह्म कमळाच्या फुलांचे दर्शन होत होते त्या पूर्ण वातावरणामध्ये एक वेगळाच सुगंध दरवळत होता. शेवटी आम्ही बारा हजार फुटांवर चा शिखांच्या पवित्र हेमकुंड साहिब ला पोहोचलो... तिथे असलेला विस्तीर्ण तलाव आज पर्यंत बघितलेल्या सर्व तलावामधला एक अतिशय सुंदर तलाव होता. धुक्याच्या चादरीत तो तलाव क्षणात गायब व्हायचा तर कधी पटकन् धुके विरून जायचे आणि तलावामध्ये मागच्या हिरव्यागार पर्वतराजीचे प्रतिबिंब दिसू लागायचे... तलावाचे पाणीही अतिशय नितळ आणि स्वच्छ होते त्या पाण्याने तोंडावरून हात फिरवल्यावर इतके प्रसन्न वाटले की सगळा शीण निघून गेला... त्या स्थळावरून निघण्याची इच्छाच होत नव्हती इतकी पवित्रता आणि सौंदर्य त्या स्थळामध्ये होते. माझ्या मते पृथ्वीवरचा स्वर्गच होता!!


समुद्र सपाटी पासून जवळ जवळ पंधरा हजार फुटांपर्यंत वर असल्यामुळे तिथे जास्त वेळ न थांबण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे आपापले पॅक लंच खाऊन फोटो काढून सर्वजण परतीच्या वाटेला लागले .आम्ही घोड्यावरुन असल्यामुळे आम्हाला उतरायला फार वेळ लागला नाही पण जे चालत येत होते त्यांना वर पोहोचण्यासाठी जवळजवळ सहा तास आणि उतरण्यासाठी चार-साडेचार तास लागले. संध्याकाळी परत साडेसहा वाजता गरम गरम समोसे, चहा ,कॉफी असा नाश्ता सगळ्यांनी घेतला .थोडावेळ दम शेराज चां खेळही झाला. रात्री गरम गरम कढी, खिचडी ,पापड असा साधाच मस्त बेत होता. थकलेले असल्यामुळे सर्वजण वेळेत झोपायला निघून गेले.


12 ऑगस्ट: दोन्ही महत्वाचे ट्रेक खुप छान रीतीने पार पडले आणि आता परतायचे वेध लागले. सकाळी लवकर उठून सात वाजता नेहमीप्रमाणे गरमागरम नाश्ता झाला त्यानंतर सर्वजण साधारण सकाळी आठ -सव्वा आठला परत गोविंद घाटकडे जाण्यासाठी 9 किलोमीटरचा रस्ता उतरण्याच्या तयारीला लागले. मागच्या वेळेस येताना रात्री कापलेला तो रस्ता आता दिवसाच्या प्रकाशात किती छान होता हे लक्षात येत होतं आजूबाजूला गर्द वनराई, अखंड वाहणारे छोटे मोठे झरे, धबधबे , हे बघत बघत सर्वजण ती चढण सर्वजण उतरू लागले होते.. पहिल्या दिवशी रात्री जिथे जिथे थांबून लिंबू पाणी किंवा मॅगी असं काही खाल्लं होतं त्या जागा आता लक्षात येत होत्या. शेवटी साधारण चार साडे चार तासाची उतरण करून आम्ही जिथून ट्रेकला सुरूवात केली होती त्या जागेवर जमा झालो. परत जीप ने चार किलोमीटरचा रस्ता पार करून आम्ही पुन्हा गोविंद घाटावर येऊन पोहोचलो तिथे आमच्या बसेस उभ्या होत्या ,त्यातून आम्ही जोशी मठाकडे जायला निघालो. रस्त्यामध्ये जेवण करून दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास आम्ही जोशीमठ येथे माउंटन व्ह्यू हॉटेलमध्ये पोहोचलो. गेल्या गेल्या आम्हाला सांगण्यात आले होते की ज्यांना अवली बघण्यासाठी रोपवे ने जायचे असेल त्यांनी लगेच तयार होऊन निघावे कारण साडेचार वाजता शेवटचा रोपवे राऊंड होता.


खोलीमध्ये सामान टाकुन, फ्रेश होऊन पटापट आम्ही दहा-बारा जण रोपवे साठी निघालो. हजार रुपये भरून रोपवे ची शेवटची जाण्या-येण्याची राउंड आम्ही बुक केली. पंचवीस मिनिटाची ती एक एक साईड राऊंड होती. एवढ्या उंचीवरून अवलि आणि आजूबाजूचा सर्व परिसर बघायला खूपच मजा येत होती. दहा हजार फूट वर पर्यंत आम्ही त्या रोप वे ने पोहोचलो. आवली हे खरेतर हिवाळ्यामध्ये स्कीईंगसाठी प्रसिद्ध आहे... या सीजन मधील हिरव्यागार रंगानी नटलेले अवली बघायला खूपच मजा आली. साधारण साडेपाच वाजता परत आलो. नंतर सर्वजण तिथे असलेला शंकराचार्यांचा मठ आणि नरसिंह मंदिर बघण्यासाठी गेलो. परत हॉटेलवर यायला आम्हाला जवळपास साडे आठ वाजले. आल्यावर थोड्याच वेळात जेवण झाले, हाउझीचा गेम खेळून झाल्यावर सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन झोपले.


१३ ऑगस्ट: आमच्या प्रवासाचा शेवटून दुसरा दिवस .नवीन आलेल्या काही नियमांमुळे आमच्यातील काहीजणांची rt-pcr टेस्ट करणं गरजेचे होते. त्यामुळे आमच्या दोन बस मधील छोटी बस त्या पंधरा सोळा जणांना घेऊन सकाळी लवकर निघणार होती. सकाळी सात वाजता इडली-सांबार, ब्रेड बटर असा नाश्ता करून छोटी बस आठ वाजता पुढे निघून गेली. मोठी बस साधारण दहा वाजता हॉटेलमधून निघाली, वाटेमध्ये गंगेच्या उपनद्या सतत आमच्या बरोबर होत्याच.. कर्णप्रयाग येथे अलकनंदा आणि पिंडार या नद्यांचा संगम पाहायला मिळाला. पुढे रुद्रप्रयाग येथे अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांचा संगम पाहायला मिळाला.


वाटेमध्ये जेवण करून साधारण पावणे सहाच्या दरम्यान आम्ही गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर येथे हॉटेल चाहत मध्ये पोहोचलो. हॉटेलच्या मागच्या बाजूलाच गंगा नदीचा प्रवाह साथ द्यायला होताच..फ्रेश होऊन चहा ,बिस्कीट खाऊन सगळ्यांनी थोडया वेळ गप्पा मारल्या. नंतर आमच्या ट्रेकचे फीडबॅक सेशन झाले... रात्रीच्या जेवणानंतर सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये आराम करायला गेले.


१४ ऑगस्ट: आज प्रवासाचा शेवटचा दिवस नेहमीप्रमाणे सात- सव्वासातला उठून सगळ्यांचा नाश्ता झाला , हॉटेल लॉनवर ग्रुप फोटोसेशन झाले आणि साधारण साडे आठ वाजता आमच्या बसेस डेहराडून एअरपोर्ट कडे जाण्यासाठी निघाल्या. वाटेमध्ये देवप्रयाग येथे अलकनंदा आणि भागीरथी यांचा संगम पाहायला मिळाला. साधारणता साडेअकरा वाजता आम्ही पहिल्या दिवशी ऋषिकेश मध्ये ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्या हॉटेलमध्येच जेवणासाठी थांबलो. मधल्या वेळेमध्ये आम्ही काही जण ऋषिकेश त्रिवेणी घाटावर जाऊन थोडीशी खरेदीही करून आलो. आल्यावर हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर अडीच वाजता आमची बस ऋषिकेश होऊन एअरपोर्टवर जाण्यासाठी निघाली. ज्या मेंबर्सनी कोविड टेस्ट केली होती त्यांचे रिपोर्ट ही तोपर्यंत आले आणि तीन- सव्वा तीन वाजता आम्ही डेहराडून एअरपोर्टवर पोहोचलो. सर्व प्रोसिजर पूर्ण करून चार वाजून पंचावन्न मिनिटांनी आमचे विमान डेहराडून वरून मुंबईकडे परत येण्यासाठी निघाले आणि संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी आम्ही मुंबई मध्ये लँडिंग केले. अशा रीतीने एक आठवडा निसर्गाच्या सानिध्यात घालवून परत मुंबईच्या धावपळीमध्ये सामावून जायला आम्ही सज्ज झालो.


16 views0 comments

Comments

Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.
bottom of page